गदिमांनी आपली पुण्यातली टिळकरोडवरची जागा ज्याची आज करोडो रुपयात किंमत असेल सुधीर फडक्यांना एका क्षणात भेट देऊन टाकली,आज सख्या भावा-बहिणी साठी सुद्धा कोणी काही करत नाही आपल्या मित्रासाठी कोण करेल?.
गदिमांची लहानपणी खूप वाईट आर्थिक परिस्थिती होती,अगदी २-३ दिवस स्टेशनवर त्यांनी पाण्यावर अगदी भूक लागू नये म्हणून
पोटाला गच्च फडके बांधून काढले आहेत.त्यावेळी औंध संस्थानचा राजा 'भवानराव पंत प्रतिनिधी' एक जाणता राजा होता त्याने गरीब विद्यार्थांसाठी राहाण्याची,जेवणाची व शिक्षणाची मोफत सोय केली होती,गदिमा तिथे 'पंचवटी' या वसतीगृहात ओँधला शिकायला होते,त्यांनी राजाला पाहीले होते,राजाची सुंदर नक्कल सुद्धा ते करत त्यामुळे त्यांचे 'औंधकर' असे नाव पडले होते.
एकदा गदिमांनी राजा समोर त्याची नक्कल करुन दाखवली,राजा खूप खुश झाला म्हणाला "हा मुलगा आपल्या औँध संस्थानचे नाव उज्वल करील..तू टाकीत जा.. (टाकीत म्हणजे टॉकीत...सिनेमात)..शिकला नाहीस तरी चालेल...." त्यांचे शब्द खरे ठरले...गदिमांनी मराठी चित्रपटात स्व:ताचे असे स्थान निर्माण केले.
पुढे १९४९-५० साली गदिमांचा सीता स्वयंवर हा चित्रपट खूप गाजला,राजाने तो चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली,गदिमांनी त्यांना दाखवला आणि त्यांना तो इतका आवडला की गदिमांना त्यांनी जवळ बोलावले व त्यांच्या पाठीवर थाप मारुन शाबासकी दिली.त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले,उपरण्याने डोळे कोरडे करीत राजा म्हणाला "पोरा,आपल्या औंधाचे नाव राखलेस,ह्याबद्दल मी तुला माझी पुण्यातली टिळकरोड (हा परीसर पंतांचा गोट म्हणून ओळखला जातो) वरची जागा दीली.तिथे तू आपला बंगला बांध आणि सुखाने संसार कर,जगदंबा तुझ्या पाठीशी आहे!."
गीतरामायणाने गदिमांना दिंगत र्किती मिळवून दिली,दैवत्वाचे स्थान त्यांना समाजात मिळाले,सुधीर फडक्यांचे पुण्यात घर नव्हते,गीतरामायणाच्या काळात एक दीवस "माझ्या मित्राचे पुण्यात घर नाही.." म्हणत गदिमांनी चक्क ही जागा सुधीर फडक्यांना भेट देऊन टाकली,टिळक रोडच्या अगदी सुरवातीला असलेली ही जागा ज्याची आज करोडो रुपयात किंमत असेल सुधीर फडक्यांना एका क्षणात भेट देऊन टाकली,आज सख्या भावासाठी सुद्धा कोणी काही करत नाही आपल्या मित्रासाठी कोणी करेल?.नंतर बाबुजींनी या जागी आपली 'चित्रकुटी' नावाची वास्तू उभारली.पुढे राजालाही जेव्हा कळले की गदिमांनी त्याजागी काही बांधले नाही ती जागा आपल्या मित्राला भेट दिली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले होते.असा राजा....असे गदिमा आता होणे नाही...
गदिमांच्या दिलदारपणाचा अजून एक प्रसंग...
गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते,मुक्काम प्रसिध्द कायदेपंडित प्रि.करकरे यांच्या बंगल्यावर होता,ग्वाल्हेरच्या साहित्य संस्थेचे ते अध्यक्षही होते.तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणा संबंधी चौकशी केली.त्यावेळी गदिमा व सुधीर फडक्यांचे संबंध काही कारणाने ताणलेले होते,ते त्यांच्या कानावर उडत उडत आले होते.
वकिल म्हणाले "अण्णासाहेब,इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते तरी रॉयल्टी वगैरे देतात की नाही?",गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली,करकर्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व म्हणाले "यावर सही करुन दया".
क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले "मग गीतरामायण लिहिलं याला काहीच अर्थ उरणार नाही,वकीलसाहेब. अहो,रामनामानं दगड तरले,मग काही गायकमित्र तरले म्हणुन काय बिघडलं!.."
करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहीले,कौतुक,आदर,भक्तिभाव,प्रेम,अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या!,किती हा मनाचा मोठेपणा!.
आज गदिमांना जाऊन ३७ वर्षे झाली,आजही गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम भारतभर होत असतात पण सर्वच रॉयल्टी देतात असे नाही,गदिमांनीच व्यक्त केलेली भावना आम्ही नव्या पिढीने जपली आहे,माडगूळकर कुटुंबियांना कार्यक्रमाचे नुसते निमंत्रण तरी असावे,परवानगी तरी घ्यावी इतकी माफक अपेक्षा असते आमची पण सर्वचजण पाळतातच असे नाही.गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात ...
"नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां ?
अवघ्या आशा श्रीरामार्पण"
आमच्या अजून काय वेगळ्या भावना असणार......"अवघ्या आशा श्रीरामार्पण..."
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.