गदिमांचे किस्से | General Articles
 •  
 • Box-C-36
 • या कोकणात आता येणार रेलगाडी
 • Ya Kokanat Aata Yenar Railgadi
 • सुमित्र माडगूळकर | Sumitr Madgulkar


 •   
  'फुलणार वैभवाने हर एक बाग,वाडी...या कोकणात आता येणार रेलगाडी...'

  निसर्गसंपन्न कोकण,नारळ-काजू-आंबा-फणसांच्या दाट बागा-वाडया,सुंदर समुद्र किनारे...घरोघरी रंगणार्‍या कोकणच्या भूतांच्या गोष्टी..धडकी भरवणारा प्रचंड पाऊस...खवय्यांसाठी समृद्ध जलसंपत्ती...अजूनही काळजात शहाळी भरलेली कोकणची साधी भोळी माणसं (भूतं सोडून !)...वरुन न दिसणारी गरीबी...कोकणात नारळ लोकांच्या डोक्यात कसे पडत नाहीत हा पुण्या-मुंबईच्या लोकांना पडलेला यक्षप्रश्न!.... कोकणात काय नाही?...

  गदिमांचा आणि कोकणचा संबंध यायचे तसे कारण नव्हते कारण गदिमा रखरखित माणदेशातले 'कुलकर्णी',पण त्या काळात मोठी झालेली लोकं आपल्या गावाचे नाव लावीत त्यामुळे 'गजानन दिगंबर कुलकर्णी' चे 'गजानन दिगंबर माडगूळकर' झाले (गदिमांचे गाव सांगली-सातार्‍यातील 'माडगूळे'),कदाचित नावातील 'माड-गूळ' मूळे गदिमा कोकणचेच असा अनेक लोकांचा समज व्हायचा.

  सहजच एक गंमतशीर प्रसंग आठवला,मी कुटुंबासोबत गणपतिपूळे येथे गेलो होतो,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात उतरलो होतो,संध्याकाळी इतर पर्यटकांसोबत नौकाविहारासाठी गेलो,थोड्यावेळाने नावाडीभाऊ रंगात आले,कोकणच्या आसापासच्या जागा दाखवता दाखवता समोर बोट दाखवून तो म्हणाला तो समोर किनारा दिसतो आहे ना ते 'मालगूंड गाव' ग.दि.माडगूळकर या गावचे!,त्यांनी गीतरामायण लिहिले,ते नाही का गाणं 'गोमू माहेरला जाते हो नाखवा,तीच्या घोवाला कोकण दाखवा..' अशी अनेक गाणी लिहिली...आम्ही शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होतो,संपूर्ण कोकणचे थापापूराण झाल्या नंतर माझे वडिल गंभीर चेहरा करुन म्हणाले,"फार चांगली माहिती दिलीत आपण,पण गंमत अशी आहे की तो समोर बसला आहे ना तो ग.दि.माडगूळकरांचा नातू आहे,त्याच्या शेजारी बसल्या आहेत त्या गदिमांच्या सूनबाई आहेत...त्यांना पण हे माहित नव्हते..."

  त्या नावाड्याचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता,नशीबाने आम्ही पाण्यात होतो त्यामूळे धरणी फाटू दे आणि मला पोटात घेऊ दे असा विचार तो बिचारा करु शकला नाही!,कविश्रेष्ठ 'केशवसूतांच्या मालगूंडला' त्याने गदिमांचे गाव केले होते,प्रसंगातला विनोद सोडला तर गदिमांनी कोकणच्या सामान्य माणसांच्या मनात मात्र सुंदर घर बांधले होते हे मात्र खरे!. असे गदिमांचे व कोकणचे 'बादनारायण' संबंध!.

  गदिमांनी १९४२ च्या स्वातंत्र्य लढयात भाग घेतला होता क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण,नागनाथ नायकवाडी,नाथा लाड,शंकरराव निकम यांच्या क्रांतिकारी जथ्यात ते ओढले गेले होते त्यामुळे त्यावेळच्या कॉंग्रेसशी त्यांची नाळ जोडली गेली होती.पुढे स्वातंत्रप्राप्तीनंतर स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या निवडणूकीची रणनीती आखण्यासाठी 'महाबळेश्वर' येथे झालेल्या कॉंग्रेस शिबिरासाठी मा.यशवंतराव चव्हाणांनी गदिमांना आवर्जून बोलावले होते.येथे स.गो बर्वे,भाऊसाहेब नेवाळकर,शरद पवार इत्यादी नेत्यांशी त्यांची चांगलीच गद्टी जमली.तेथे जमलेल्या बैठकीत केवळ कॉंग्रेसच्या निवडणूकीतील विजयाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्राच्या भावी विकासाचा आराखडाच या निवडणूक प्राचारगीतांतून महाराष्ट्रासमोर मांडण्याचा विचार बैठकीत पुढे आला.अर्थातच प्रचार गीतांची जवाबदारी गदिमांवर व प्रसिध्द संगीतकार वसंत देसाई यांच्यावर सोपवण्यात आली.

  निसर्गसौंदर्याने समृद्ध पण दळणवळणाची योग्य साधने नसल्यामुळे मागासलेले कोकण वषानूवर्ष गदिमा पहात होते,कोकणात जर रेल्वे आली तर कोकणचा विकास अतिशय वेगाने होईल हे गदिमांच्यातल्या द्रष्ट्या ने बरोबर ओळखले होते व त्यातूनच कोकण रेल्वेच्या भावी योजनेचे सुंदर प्रचार गीत जन्माला आले 'फुलणार वैभवाने हर एक बाग,वाडी...या कोकणात आता येणार रेलगाडी...'

  पण अजून कोकणात 'अच्छे दिन' आले नव्हते,गदिमांचे कोकण रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्ष्यात यायला १९९५ साल उजाडावे लागले,१९९५ साली क्रेंद्रिय रेल्वे राज्यमंत्री पुण्याचे होते,गदिमांचे मित्र बाळ चितळे यांनी ह्या दुर्मिळ गाण्याचे रेकॉर्डिंग जिवापाड जपून ठेवले होते.ते रेल्वे मंत्र्यांना जाऊन भेटले त्यांना हे गाणे ऐकवले.
  कोकण रेल्वेच्या सुरवातीच्या टप्प्याच्या उद्घाटनाचा दिवस होता,स्टेशनवर आशा भोसले यांच्या मधूर आवाजातील या सुंदर गाण्याला सुरवात झाली,मंत्र्यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला व गदिमांच्या स्वप्नातील कोकण रेलगाडी सेवा प्रत्यक्षात सुरु झाली.

  कोकण रेल्वेचे स्वप्न गदिमांनी त्याकाळात पाहिले होते,हे दुर्मिळ गीत खास तुमच्यासाठी,गदिमा वेबसाईट वरुन आपण हे सुंदर गीत ऐकू ही शकता.लिंक गाण्याच्या शब्दांनंतर दिली आहे.


  या कोकणात आता येणार रेलगाडी...

  फुलणार वैभवाने हर एक बाग,वाडी
  या कोकणात आता येणार रेलगाडी

  फिरणार हात पाठी जनमाय कोयनेचा
  होणार यज्ञ येथे उद्योग साधनेचा

  ये सूर्य सोनियाचा,अवशेष रात्र थोडी
  या कोकणात आता येणार रेलगाडी

  पेठा विलायतेच्या जिंकील आम्र,काजू
  येवो कुबेर येथे,मग दौलतीस मोजू

  माशास सोनमासा,देणार हीच खाडी
  या कोकणात आता येणार रेलगाडी

  मागास काल होता,हा प्रांत कोकणाचा
  आशीर्वचास देई तो साद रे कुणाचा

  लोखंड गंजलेले परिसास कोण जोडी
  या कोकणात आता येणार रेलगाडी

  राणी स्वत: स्वत:ची,झाली स्वतंत्र माता
  ठेवील दूर केवी,ती बालकास आता

  महाराष्ट्र-माय बाळा,प्रेमे कुशीत ओढी
  या कोकणात आता येणार रेलगाडी

  /marathi-songs/playsong/393/Ya-Kokanat-Aata-Yenar-Railgadi.php


गदिमा गौरव | Special Quotes
 • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
  महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत लेख | Related Articles
गीतरामायण अॅप | GeetRamayan App
 • "गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!.
  आजच डाऊनलोड करा

  GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link
 • Box-RB-1