गदिमा नवनित
  • झटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा
    फुलला पहा सभवती आनंद जीवनाचा
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (आकाशवाणी,संगीत:सुधीर फडके | Geetramayan (Akashwani)
  • आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.

    आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अ‍ॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.

    गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
  • Box-C-19
  • स्वयंवर झाले सीतेचे
    Swayamvar Zale Siteche

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (आकाशवाणी)      Album: GeetRamayan (Akashwani)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)
  • आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
    स्वयंवर झालें सीतेचे

    श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
    पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
    उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें

    मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
    नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
    फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें

    उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
    तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
    श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे

    अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
    मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
    तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे

    हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
    "आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
    आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे

    पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
    अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
    गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें

    नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
    तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
    सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे

    झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
    गगनामाजीं देव करांनी करिती करताला
    त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे

    अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
    गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
    आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें