जोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.
गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.
जा घेउन संदेश!
मेघा,जा घेउन संदेश!
उल्लंघुनिया सरिता,सागर,नानापरिचे देश
रणांगणावर असतिल जेथे
रणमर्दांची विजयी प्रेते
गगनपथाने जाउन तेथे
प्राणसख्याच्या कलेवराचा निरखुन बघ आवेश
हाडपेर ते थेट मराठी
हास्य अजुनही असेल ओठी
शवे शत्रुचीं असतिल निकटी
अंगावरती असेल अजुनी सेनापतिचा वेष
अर्धविलग त्या ओठांवरती
जलबंदूचे सिंचून मोती
राजहंस तो जागव अंती
आण उद्यांच्या सेनापतिला जनकाचा आदेश
डोळ्यांमधली तप्त आंसवे
थांबच देत्ये गड्या तुजसवें
पुढे न आतां मला बोलवे
सांग गर्भिणी खुशाल आहे पोटीचा सेनेश
ज्योतीसाठी जगेल समई
भिजविल तिजला रुधिरस्नेही
वाढत जाइल ज्योत प्रत्यही
नकाच ठेवूं आस मागची,इतुके कुशल विशेष
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..