जोगिया हा गदिमांचा पहिला काव्यसंग्रह,प्रस्तावनेत गदिमा म्हणतात जीवनव्यवसाय म्हणून लेखणीशी अनेकदा बेईमानी करण्याचा प्रसंग मजवर आला-येतो आहे.या संग्रहातील कविता ही मात्र व्रतस्थपणे केलेली काव्यनिर्मिती आहे.या संग्रहाला जोगिया असे नाव म्हणूनच द्यावेसे वाटले.
गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक १६ कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे.
प्राणपणाने लढा लढविला
गड वसईचा नाहीं पडला
वीर चिमाजी पुरता चिडला
शब्दासरशीं त्याच्या झाले कैक फिरंगी ठार!
साम्राज्याचा उमदा नोकर
भानावर ये पाहुन संगर
गोळ्या झाडित अधिकार्यावर
मंगल पांडे गर्जत सुटला वेडा जयजयकार!
अजाण भेसुर,भयाण प्रांती
विनायकाच्या जिव्हेवरती
नाचलीस तूं करित झंकृती
अवध्य मी या मूक गायनें भरलें कारागार!
चला चालते व्हा रे येथुन!
आर्त महात्मा सांगे गर्जुन
त्या सादाने घुमले त्रिभुवन
क्षणाक्षणाला घडव अम्हांला असले साक्षात्कार!
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य बा.भ.बोरकर:
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.