तुम्ही अनिल कपूर व श्रीदेवीचा मि.इंडिया चित्रपट पाहिला असेलच,त्यात अनिल कपूर हातात गॅझेट घालून अदृष्य होत असतो व मोगॅंबो समवेत गमती-जमती करत असतो,आता गदिमा जर अचानक अदृष्य झाले तर काय होईल,गदिमांचा एक गमतीदार किस्सा!.
पुण्यातल्या सदाशिव पेठेतला टिळक रोडच्या सुरवातीचा काही भाग त्यावेळी 'पंतांचा गोट' या नावाने
ओळखला जात असे,गदिमांचे सहाय्यक व प्रपंच,लक्ष्मीची पाऊले सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक म.गो तथा बाबा पाठक त्यावेळी तीथे राहत असत,छोटीशी खोली होती,१० बाय १० ची असेल.गदिमा त्याकाळात कोल्हापूरला रहात होते,सर्व मराठी चित्रपटसृष्टीचा कारभार त्यावेळी कोल्हापूरातूनच चालत असे,त्यावेळी गदिमांचे पुण्यात घर नव्हते त्यामुळे ते पुण्यात येत तेव्हा बाबा पाठकांच्या खोलीतच उतरत असत.
एक दिवस असेच अचानक गदिमा पुण्यात आले व पाठकांच्या खोलीत उतरले,गदिमा आले की त्यांच्या मित्रांचा मोठा राबतापण त्या खोलीत असे.पण यावेळी गदिमांनी आपण येत असल्याचे कोणालाच कळवले नव्हते,कुठल्यातरी गहन विचारात होते,पहाटे पहाटे ४.३०-५ ला ऊठुन बसले व बाबा पाठकांना म्हणाले...
'बाबा,आज मला खूप महत्वाचे लिहायचे आहे,कोणीही मला भेटायला आले तर मी नाहीये सांग,मला आज अजिबात वेळ नाहीये,अगदी जेवायला सुध्दा मला ऊठवू नकोस आणि हे बघ १२ च्या सुमारास एक बाई येतील,हौशी नवोदित कवियत्री आहेत त्यानां मला कविता दाखवायच्या होत्या,मीच वेळ दिली आहे पण आज मला जमणार नाही,काहीतरी कारण काढ व त्यांना टाळ!'.
बाबांना कळेना इतके काय महत्वाचे लिहायचे आहे व इतकी घाई का करत आहेत,दुपार होत आली गदिमांची तंद्री लागली होती खोलीच्या दारातून बाबांनी बघितले,लांबून एक मध्यमवयीन बाई येत होत्या,हातात एक मोठे कागदाचे बाड होते,बाबांनी ओळखले ह्याच त्या कवियत्री बाई!.बाबांनी खोलीचे दार लोटले व दाराच्या बाहेर जाऊन ऊभे राहीले.५ मिनीटे झाली बाई हाश हूश करीत आल्या.
'गदिमा आहेत का,मी अमूक तमूक,त्यांनी मला आज दुपारची वेळ दिली होती'.बाबा म्हणाले 'माफ करा,गदिमा तुमचीच वाट बघत होते,पण एक अतिमहत्वाचे काम निघाले,त्यांना बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता',बाईंच्या चेहर्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती,पण काय करणार.
'मी थांबू का थोडा वेळ?,त्यांची वाट बघते,येतील ना ते लवकर?',गदिमा आत लिहित बसलेले आणि त्या बाई व त्यांच्या मध्ये फक्त लाकडी दार,बाई थांबल्या तर फार मोठा समर प्रसंग येईल,बाबा म्हणाले 'नका नका,त्यांना यायाला खूप उशीर होईल,संध्याकाळ तर होईलच,बहूतेक जेऊनच येतील रात्री'.
बाई मोठ्या नाराजीने म्हणाल्या 'ठीक आहे..,पण मला जरा पाणी मिळू शकेल का,खूप लांबून आले आहे',आता आली मोठी पंचाईत स्त्रीदाक्षिण्य तर पाळायला हवे,त्यात बाई घामाने निथळत होत्या,हाश हूश चालूच होते,कोणी पाणी मागितले तर नाही कसे सांगणार.बाबांची आता पुढे काय होणार या कल्पनेने गाळण ऊडाली,गदिमा अति कोपिष्ट आता आपल्या कानाखाली 'सणसणीत' मिळणार या कल्पनेने बाबांना घाम फूटला.अशीही परिस्थिती नव्हती की हळूच गुपचूप आतून पाणी आणावे,छोटीशी तर खोली आणि दारातच बाई उभ्या व दारापलीकडे खुर्चीवर गदिमा लिहित बसलेले.
बाबांनी हिंमत करुन दार उघडले व आत प्रवेश केला...,आणि काय आश्चर्य गदिमा खोलीत कुठेच दिसेनात,बाबांचे डोळे चक्राऊन गेले,गदिमा गेले कुठे?,छोटीशी खोली सामान काय तर खुर्ची,कॉट व थोडेफार ब्रम्हचार्याचे सामान असेल तितकेच,एकच गजांची खिडकी,दुसरे दारच नाही.बाबांना काहीच कळेना.
बाई कॉटवर येऊन बसल्या,बाबांनी माठातले गार गार पाणी त्यांना दिले.बाईंच्या चेहर्यावर जरा तरारी आली,बाई ५-१० मिनिटे बसल्या 'धन्यवाद!,मी निघते आता,गदिमांना सांगा मी येऊन गेले.'
बाई दाराच्या बाहेर गेल्या,बाबा दार लावतात तितक्यात धाड-धूडूम आवाज करत गदिमा कॉट खालून बाहेर पडले!.बाबा बघतच राहीले.गदिमां चांगलेच घामाघूम झाले होते,मोठ्याने श्वास घेत होते.
'बाबा,वाचवलस लेका,अजून ५ मिनीटे जरी त्या बाई थांबल्या असत्या तरी माझे काही खरे नव्हते बघ,त्या कॉट खाली मी कसा घूसलो ते माझे मलाच माहित...पार शरिराचे गाठोडे झाले बघ..'
बाबा म्हणाले 'अण्णा,मी घाबरुनच गेलो होतो,वाटलं तुम्ही अंर्तधान पावलात की काय!.'
गदिमा परत लिहायला बसले,बाबा बघतच राहिले,संध्याकाळ झाली गदिमा लिहितच होते,शेवटी एकदा लिहून पूर्ण झाले.थोड्यावेळाने घरापुढे एक मोठी गाडी येऊन थांबली,मोठी व्यक्ति असावी,बहूतेक कोणी निर्माता असावा,गदिमांनी लिखाण त्या माणासाच्या हातात स्वाधिन केले,त्यांने १०० च्या करकरीत २० नोटा त्यांच्या हातावर टेकवल्या व तो निघून गेला.
'बाबाराव या,बसा इकडे..आता सांगतो आमचे काय उद्योग चालले आहेत सकाळ पासून,अरे आपल्या व्यंकटेश (गदिमांचे धाकटे बंधू व ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर) चा उद्या वाढदिवस आहे,तो अनेक दिवस मागे लागला आहे रायफल घेऊन दया म्हणून,तुला माहितच आहे माझ्या डोक्यात जरी विद्या असली तरी खिशात नेहमी मंदी असते!,त्यासाठीच सकाळ पासून एका चित्रपटाची पटकथा लिहित होतो,चला आता व्यंकोबांना मस्त रायफल घेऊन देईन,हे पैसे त्याला दे,त्याला सांग तुझ्या पसंतीची रायफल घे,त्याचा वाढदिवस मस्त जाईल...'
कितीहे बंधूप्रेम! त्याकाळात गदिमांची आर्थिक स्थिती फार काही चांगली नव्हती पण आपल्या भावंडांसाठी ते काहीही करायला तयार असत,खर्या अर्थाने ते माडगूळकर कुटुंबातले 'कर्ता' होते.
व्यंकटेश माडगूळकरांना त्यांच्या आयुष्यातली पहिली बंदूक गदिमांनी घेऊन दिली,पुढे व्यंकटेश माडगूळकरांनी अनेक जंगल कथा,पुस्तके लिहिली व एक मोठे लेखक म्हणून नावलौकिक मिळवला.त्यांच्या माकडांच्या टोळीवर आधारीत 'सत्तांतर' ने तर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवला.
आजकाल परक्यांसाठीसोडा पण स्व:ताच्या बहिण-भावासाठी जरी काही करायचे असेल तरी माणूस 'अदृष्य' होतो!,पण स्व:ताच्या
भावाच्या आनंदासाठी 'अदृष्य' होणारे गदिमा आता होणार नाहीत...
तो काळ वेगळा होता....ती माणसे वेगळी होती.....
गदिमा गौरव | Special Quotes
पु.ल.देशपांडे:
महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.