गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
गीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.
साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची, करणे तुज स्वीकृति
तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं ?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति
पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
त्रिलोकांनधे भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति
महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणांसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं मग्न राहुं दे, सदा आमुची मति
विनोद नच हा, हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति
ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींत गे दिसलें सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति ?
गदिमा गौरव | Special Quotes
लेखक पु.भा.भावे:
वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.