गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गीतरामायण (गायक व संगीत सुधीर फडके) | Geetramayan (Sung By Sudhir Phadke)
  • sudhir phadkeगीत रामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.

    साधारण १९५३ साली पुणे आकाशवाणी हे केद्र सुरु झाले.श्री सीताकांत लाड नावाचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले होते नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावे, असा त्यांनी गदिमांना खूप आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला.रामायणात वाल्मीकींनी २८००० श्लोकांत रामकथा लिहिली आहे.गदिमांनी तीच रामकथा एकूण ५६ गीतांत शब्दबध्द केली आहे.
  • Box-C-17
  • तात गेले ,माय गेली,भरत आता पोरका
    Tat Gele Mai Geli Bharat Ata Poraka

  • गीतकार: ग.दि.माडगूळकर      Lyricist: Ga.Di.Madgulkar
  • संगीतकार: सुधीर फडके      Music Composer: Sudhir Phadke
  • गायक: सुधीर फडके      Singer: Sudhir Phadke
  • अल्बम: गीतरामायण (सुधीर फडके)      Album: GeetRamayan (Sudhir Phadke)





  •     MP3 player is mobile compatible
        (हा प्लेअर मोबाईल वर पण चालतो)

  • तात गेले, माय गेली, भरत आतां पोरका
    मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका

    वैनतेयाची भरारी काय माशकां साधते ?
    कां गजाचा भार कोणी अश्वपृष्ठी लादतें ?
    राज्य करणें राघवांचे अज्ञ भरता शक्य का ?

    वंशरीतीं हेंच सांगे- थोर तो सिंहासनीं
    सान तो सिंहासनीं कां, ज्येष्ठ ऐसा काननीं ?
    दान देतां राज्य कैसे या पदांच्या सेवका ?

    घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
    कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो ?
    काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका ?

    पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
    याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
    चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका

    राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या ही मंदिरीं
    नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
    भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका

    चालवितों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
    मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
    नांदतों राज्यांत, तीर्थी कमलपत्रासारखा

    सांगतां तेव्हां न आले, चरण जर का मागुती
    त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्‍निदेवा आहुती
    ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाउलांची मृत्तिका


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी | Related Marathi Songs