आपल्या सगळ्यांचे लाडके गीतरामायण ६० व्या वर्षात (हीरकमहोत्सवी) पदार्पण करीत आहे,महाकवी ग.दि.माडगूळकर व संगीतसुर्य सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेल्या गीतरामायणाची वाटचाल १ एप्रिल १९५५ रोजी पुणे आकाशवाणी पासून सुरु झाली.
आज साठ वर्षे झाली तरीही रेडिओ, ग्रामोफोन, वृत्तपत्रे, कॅसेट, टेलिव्हीजन, संगणक, सीडी, इंटरनेट,फेसबुक,मोबाईल अॅप या सर्वच माध्यमातून यशस्वीपणे प्रवास करणारा हा एकमेव कलाविष्कार असावा!.
गदिमा व बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या निर्मितीत ज्या महान कलाकारांचा वाटा आहे त्यांचा उल्लेख करणे आज अपरिहार्य आहे,संयोजक सिताकांत लाड,गायक-गायिका माणिक वर्मा,लता मंगेशकर,ललिता फडके,मालती पांडे,वसंतराव देशपांडे,गजाननराव वाटवे,राम फाटक,व्ही.एल.इनामदार,सुरेश हळदणकर,बबनराव नावडीकर,चंद्रकांत गोखले,प्रमोदिनी जोशी,मंदाकिनी पांडे,योगिनी जोगळेकर,कुमुदिनी पेडणेकर,सुमन माटे,जानकी अय्यर,संगीत संयोजक प्रभाकर जोग व सौ.जोग,वादक अप्पा इनामदार,अण्णा जोशी,केशवराव बडगे व अनेक दिग्गज कलाकारांच्या अथक प्रयत्नातच गीतरामायणाचे यश सामावले आहे.
स्त्रीया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल - दीपक
नृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर, नगरिं, घरीं, अंतरीं
इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी, अतुलप्रभा सुंदरी
तिघी स्त्रीयांच्या प्रीतसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता, प्रीतिच्या अंबरी
शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती, छळिते अभ्यंतरी
राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य - धनाचें ?
कल्पतरूला फूल नसे कां, वसंत सरला तरी
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....